Skip to main content

इस्रायलवर इराणचा १८० मिसाईल्‍सचा हल्‍ला, इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा

 

इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) उशिरा रात्री इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाईल्स डागल्या. यामधील काही मिसाईल्स इस्रायलच्या भूभागावर पडल्या आहेत.

यावर्षी इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलमध्येही इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे हे हल्ले आता थांबले असून सध्या कोणताही धोका नाहीये.

मात्र, या हल्ल्यामुळे इस्रायलचं किती नुकसान झालं आहे, त्याची स्पष्टता अद्याप आलेली नाही.

इस्रायलच्या टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये स्थानिक वेळेनुसार, रात्री पावणेआठच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी) काही वेळ आधी तेल अव्हीव आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये आकाशामध्ये काही मिसाईल्स दिसून आल्या.

या हल्ल्यादरम्यान काही मिसाईल्स निश्चित ठिकाणी धडकल्या असल्याचं सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सैन्यातील एका प्रवक्त्याने म्हटलं की, हे हल्ले इस्रायलच्या मध्य आणि दक्षिण भागावर झाले आहे.

दुसऱ्या बाजूला, इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कोअरचं (आयआरजीसी) म्हणणं आहे की, त्यांच्या सैन्याने पहिल्यांदा हायपरसोनिक मिसाईल्सचा वापर केला असून 90 टक्के प्रोजेक्टाइल्स (मिसाईल्स / ड्रोन्स) योग्य निशाण्यावर लागले आहेत.

आयआरजीसीच्या सूत्रांनी इराणच्या सरकारी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की, इस्रायलची तीन लष्करी तळे या हल्ल्यामधील लक्ष्य होते.

मात्र, दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे की, इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाईल्सना 'मोठ्या प्रमाणावर' नष्ट करण्यात आलं.

तेल अव्हीव शहराच्या आकाशामध्ये चमकत्या उजेडाच्या तिरीप दिसत होत्या. इस्रायलच्या एअर डिफेन्सने या मिसाईल्सना थांबवल्याचं त्या निदर्शक होत्या.

जेरुसलेममधील बीबीसी कॉरस्पॉडन्ट्सनी म्हटलं की, त्यांना कमीतकमी दोन मिसाईल्स इंटरसेप्ट केल्याचा आवाज ऐकू आला.

दुसऱ्या बाजूला, इस्रायलच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे की, त्यांना आतापर्यंत कुणीही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

 

इराणमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा

इराणने इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर लगेचच तेहरानमधील पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कारण या हल्ल्यानंतर आपल्या वाहनांना इंधनाचा तुटवडा भासणार आहे हे नागरिकांना माहीत असल्याने सर्व नागरिकांनी आपापल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. पेट्रोल पंपाभोवती गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.